ठेल्यावरच्या पाणीपुरी सारखी चवदार पाणीपुरी घरच्याघरी कशी बनवायची?

बाहेर ठेल्यांवर मिळणारी पाणीपुरी चटपटीत, चवदार असते खरी पण ती तितकीच आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यात वापरलेले पाणी, भांडी अस्वच्छ असतात. फूड इन्फेक्शन होऊ शकते. तर मित्रांनो मराठी लव्ह स्टोरीजच्या आजच्या या आर्टिकल मध्ये घरच्याघरी चटकदार पाणीपुरी कशी बनवायची पाहूया.
साहित्यः पुरीसाठी: मैदा - १ (नैवेद्याची) वाटी, बारीक रवा - १ वाटी, मीठ - चवी नुसार, तेल - तळण्यासाठी


पाणीपुरीचे पाणी: पुदीना पाने - एक मूठ, कोथींबिर - २ मूठी, हिरव्या मिरच्या - ४, काळे मिठ - १ टेबलस्पून
चिंच-गुळाचे पाणी: चिंच - १ लिंबाएवढी, गूळ - २ लिंबांएवढा, जीरे पावडर - १ टीस्पून, पांढरे मीठ - १/२ टीस्पून
रगडा: पांढरे वाटाणे - १/४ वाटी, कांदा - १, टोमॅटो - २, आलं-लसूण पेस्ट - १/२ टीस्पून, तेल - पाव वाटी, तिखट १/२ टीस्पून, हळद - १/४ टीस्पून, छोले मसाला - १ टीस्पून.


कृती: पुर्‍या: मैदा, रवा आणि मीठ एकत्र करून घट्ट भिजवा. त्याची पातळ पोळी लाटून एखाद्या छोट्या झाकणाने पुर्‍या कापून घ्या. मध्यम आंचेवर तेल तापवून सोनेरी रंगावर तळून घ्या.
पाणीपुरीचे पाणी:
पुदीना, कोथींबिर, मिरच्या बारीक चिरून मिक्सरवर ग्राइंड करून घ्या. एखाद्या बारीक गाळणीतून वरील मिश्रण गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यात काळे मिठ चवीनुसार मिसळून थंड पाण्याने हे गाळलेले पाणी पातळ करून घ्या.
चिंच गुळाचे पाणी: चिंच आणि गुळात थोडे पाणी घालून शिजवून घ्या. गॅस वरून खाली उतरवून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर चिंच हाताने कुस्करून मिश्रण गाळणीने गाळून घ्या. त्यात आता जीरे पावडर आणि मीठ घालून चव जुळवून आणा.
रगडा: वाटाणे किंचीत सोडा घालून ५-६ तास भिजत घाला. नंतर, कुकर मध्ये किंवा ओपन शिजवून घ्या.
कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या.कढईत तेल तापवून त्यावर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतला की आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्या नंतर बारीक चिरलेला टोमॅटो त्यात घालून वरून चवीनुसार मीठ घाला आणि टोमॅटो शिजेस्तोवर परता. टोमॅटो शिजून एकजीव झाला की त्यात तिखट, हळद, छोले मसाला घालून तेल सुटेस्तोवर परता. आता यात शिजवलेले वाटाणे घाला. जास्त पाणी घालू नका. घट्टसरच ठेवा. किंचीत उकळून खाली उतरवा. आता, तिन वाट्यांमध्ये चिंच-गुळाचे पाणी, पुदीना-कोथींबिर पाण आणि रगडा काढून त्या बरोबर बशीत ७-८ पुर्‍या सजवून सादर करा.


टीपः पाणीपुरीचे पाणी आणि रगड्यातील साहित्याची प्रमाणे ऐच्छिक आहेत. आपल्या चवीनुसार प्रमाण कमी जास्त करण्यास हरकत नाही. पुर्‍या आणि चिंच गुळाचे प्रमाणे शक्यतो बदलू नये. प्रत्यक्ष पाणीपुरी बनविताना, चिंच गुळाच्या पाण्याचे प्रमाण तिखट पणाच्या आवडीनुसार जुळवून घ्यावे. चिंच गुळाचे पाणी पुर्णतः टाळले तरी चालेल.

Post a Comment

0 Comments