तिचे डोहाळे - स्त्री विशेष कथा

तिला नुकताच तिसरा महिना लागला होता. पहिलच मूल असल्यानं तिला हे सगळं नवीनच होतं. त्यात सासरी फक्त ही, नवरा आणि सासरे, त्यामुळे तिथेही फारशी मदत नव्हतीच. उलट ही ह्या घरी आल्यानंतर सगळं घर हिच्यावरच अवलंबून !! जणू इतकी वर्ष हे घर तिचीच वाट पाहत असल्यासारखं. नवीन नवीन तिला थोडा त्रास व्हायचा पण शेजारी कोणाची तरी मदत घेऊन ती वेळ निभावून न्यायची. आताही ह्या पहिले पणाच्या गरोदरपणात तिला थोडा संकोच वाटायचा, कुठे मळमळतय, थोडा थकवा जाणवतोय असं काहीसं व्हायचं पण सांगू कोणाला असं व्हायचं तिला, नवरा आणि सासरे दोघेही प्रेमळ च होते तिचे पण तरीही घरात एका समजून घेणाऱ्या स्त्रीची कमतरता नेहमी जाणवायची तिला. आज ही तिला असंच कसंतरी होत होतं, पण ऑफिस ला तर जावेच लागणार होते. शिवाय आज तिला घाईने पळायचं होतं ऑफिस ला. त्यामुळे रोजच्या पेक्षा आज अजूनच धावपळ झाली तिची. तिला काही खावेसे ही वाटत नव्हते, काहीतरी गोड खावे का असे वाटत असतानाच तिचे लक्ष घडाळ्याकडे गेलं आणि तिनं तो विचार सोडून दिला. पटकन बस पकडली आणि ऑफिस ला पोहोचली. गेल्या गेल्या घटघट पाणी प्यायली, शेजारील टेबल वरील मिसेस जोशींनी विचारले ही तिला की 'अग काय होतंय का तुला?'पण थोडासा थकवा वाटतोय एवढंच बोलून ती कामाला लागली, लंच time होत आला होता पण आज गडबडीत डबा च आणायचा विसरली ती!! इतकी चरफड झाली तिची, सकाळपासून एकतर बरं वाटतं नव्हतं म्हणून काही खाल्लं ही नव्हतं आणि आता डबा विसारल्यानं भुकेनं म्हणा किंवा एकूणच थकव्यामुळे तिचे डोळे उगाच भरून येऊ लागले, आई जवळ असती तर आता काहीतरी छान पैकी गोड पदार्थ बनवून आणला असता. गोड पदार्थ म्हणताच तिला तिच्या आवडीची इमरती जिलेबी आठवली. पण आता कॅन्टीन मधलं काहीतरी बेचव खावे लागणार म्हणून ती त्राग्यानेच उठली,तेवढ्यात ऑफिस चा शिपाई डबा घेऊन तिच्याकडेच येत असलेला तिला दिसला. तिच्या हातात डबा देत तो पुन्हा निघून गेला. डबा उघडून बघते तो गरमागरम वरण भात होता, घाईने तिनं तो पटकन खाऊन घेतला आणि डब्याचा  खालचा कप्पा ही जड लागला म्हणून उघडून बघते तो त्यात तिची आवडती इमरती जिलेबी होती आणि एक चिट्ठी' बेटा, मला मुलगी नाही त्यामुळे अनुभव नाही, गेली कित्येक वर्ष ह्या घरालाच कुठल्या स्त्रीचा स्पर्श नाही,अनुभव नाही, तू आलीस आणि आम्हाला आपलंसं केलंस पण सून म्हणून एक अवघडले पण आहेच, नुकतीच तुझी गोड बातमी आपल्या घरात आलीये पण त्यातही तुझ्याशी कसं वागावं, तुझी कशी काळजी घ्यावी ह्यात माझा गोंधळ उडतोच आहे. पण दुरून का होईना तुला ह्या गरोदरपणाचा थोडा त्रास होतोय आणि कोणीतरी आपली काळजी घ्यावी असं तुला वाटतंय हे जाणवलं मला, आज तू डबा विसरलीस आणि सकाळी निघताना ही अस्वस्थ वाटलीस म्हणून मग मनानेच हा  डबा घेऊन आलो तुझ्यासाठी, हा आणि गोड म्हणशील तर तुझ्या सासूला ही ह्याच जिलेबीचे डोहाळे लागले होते म्हणून अंदाजाने खाऊ आणला तुला, आवडला तर खा,त्याची सक्ती नाही,वरण भात मात्र जरूर खा' तिला समजेनाच की आपण रडतोय काय  आणि रडता रडता जिलेबीही खातोय काय!! पण एक मात्र कळलं की 'काळजी घ्यायला नेहमी आईच हवी असं नाही कधी कधी आईचं हृदय असलेले बाबही चालतात काळजी घ्यायला'!!

Post a Comment

0 Comments